आला पर्जन्याचा काळ।
बरवे उत्साह सुकाळ।।
ग्रीष्मातले सर्वे आळोखे।
देऊनि मिटले, सर्व पिळोखे।।
आळोखेपिळोखे देऊन कसा तरी लोटायचा ग्रीष्म काळ संपून उत्साहवर्धक पर्जन्याचा काळ येतो. त्याच्या सुगंधाने तो आल्याची चाहूल लागते. वाजत गाजत सडे शिंपडीत, अत्तर उधळीत पर्जन्य ऋतू येतो. आकाशापासून धरतीपर्यंत संपूर्ण वातावरण आणि त्यातील चराचर व जडाजड सर्व प्राणिमात्र त्याच्या स्वागताला तयार असतात. महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील श्रेष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या लेखणीने या पर्जन्याचे गोडवे गाऊन आपल्या शब्दांच्या हिंदोळ्यावर मराठी रसिकांना झुलविले आहे.
पाऊस आला वारा आला।
पान लागले नाचू।
थेंब तपोरे गोरे गोरे।
भर भर गारा वेचू।
अवकाळी पाऊस अंगतुकासारखा येतो. हवामान खात्याचे अंदाज चुकवत तो स्वतःच काढलेल्या मुहूर्तावर येतो.
बेसावध असलेल्यांना आपल्या धो धो सरींनी चिंब भिजवून काढतो. अशा अवेळी आलेल्या पावसावरील आपलाही राग क्षणभरातच निवळतो आणि आपणही त्याचा आगमनाचे स्वागत करतो. ग्रीष्माने झालेली अंगाची लाही संपण्याचा आनंद. पण अवकाळीच तो. ग्रीष्म म्हणतो माझा वेळ अजून संपला नाही आहे. तू कशाला आलास? ग्रीष्म कसला महान म्हणतो तर बघा कसा!
अरे अवकाळ्या जाशील क्षणात।
आठवण फक्त ठेवूनि मनात।
आपला तास सुरु होण्या आधीच दुसऱ्या शिक्षकाच्या वर्गात प्रवेश करणाऱ्या शिक्षकासारखी फजिती होते. पण ती तेवढ्या पुरतीच. पुढचा तास माझा असण्याची जाणीव तर विद्यार्थांना झाली.
गर गर गिरकी घेते झाड।
धड धड वाजे दार- कवाड।
अंगणातही बघता बघता।
पाणी लागले साचू।
आला पाऊस! आला पाऊस!
मातीच्या वासात गं!
मोती गुंफीत मोकळ्या केसात गं!
आभाळात आले काळे ढग!
धारा कोसळल्या निवे तगमग!
धुंद दरवळ धरणाच्या श्वासात गं!
ज्यावेळी निसर्ग आपल्या संतुलनात होता, सरिता दुधडी भरून वाहत होत्या. नाले, ओहोळे, झरे आपापल्या मर्यादेत आखलेल्या मार्गाने दुडूदुडू धावत होते. वाहतांना आपल्या धारांचे स्वर संगीत वातावरणात पसरवीत होते. कधी खळखळ, कधी झुळझुळ, कधी झर झर असा रव निसर्गात पसरून जवळपासच्या पशुपक्षात जलतृष्णा भागावण्याची आस जागृत होत होती. धार न तुटता बारमाही प्रवासाची दृश्ये सगळीकडे दिसत असत. जगोजागी धरणांच्या भिंतींनी प्रवाह खंडित होत नव्हता. पहिल्या पावसाने सुटलेला मातीचा सुगंध हा नुसताच दर्पने युक्त नसतो तर नशेनेही युक्त असतो, पाऊस व धरतीच्या श्रुंगाराशी असतो.
मातीच्या सुटलेल्या वासाने जणू मोत्यासमान माळ मोकळ्या केसांत गुंफल्यावर येणाऱ्या रमणीच्या केशकलापातील मेहकच जणू!
कोसळत्या कशा सरीवर सरी।
थेंब थेंब करी, नाच पाण्यावरी।
लाल ओहळ वाहती जोरात गं।
वीज कडाडता भय दाटे उरी।
पुरातन काळापासून वर्षा ऋतूतील आषाढ, श्रावण महिन्यातील पावसाळी वरदानावर , खेळियावर जितके काव्य झाले असतील तितके फ़ार तर चंद्र, सूर्य, आकाश, धरती, सागर इत्यादींवर झाले असतील. त्यातही हे सर्वे उदाहरणे पावसाळी चमकृतीत शामिल असतातच!
Comments
Post a Comment