ज्या समाजाला आपण आपलं मानतो त्या समाजातले काही जण वेड्यासारखे वागतात. एक साधं उदाहरण घ्या, करोना व्हायरस चीन मध्ये धुमाकूळ घालत असताना आमच्या नागपुरातील काही फार बिनधास्त होते. म्हणे नागपुरी खर्रा करोना व्हायरस वर रामबाण उपाय आहे! गमतीचा भाग सोडला तर नागपूर मध्येच नाही तर अनेक शहरांमध्ये, खेडेगावांमध्ये खर्राचे सेवन होते. आणि मग हे खर्रावीर 'सारे विश्वाची माझे घर' समजून कुठेही थुंकतात. गाडी चालवतांना कोण कुठे थुंकेल आणि थुंकीचे तुषार कुठून तुमच्या अंगावर येतील कळणारही नाही. थुंकणाऱ्याला मात्र त्याचे काहीही वाटत नाही. खर्रा खाऊन बोलणाऱ्याची तऱ्हाही वेगळीच. थुंकायचही नाही आणि बोलायचही आहे. जर बोलणे महत्त्वाचे असेल तर इतका बहुमूल्य खर्रा थुंकावा लागतो किंवा गिळावा लागतो.
थुंकणाऱ्याला कलाप्रेमींचा दर्जा द्यायला पाहिजे, भिंत कुठलीही असो तिथे त्यांचा कॅनव्हास असतो. बिना ब्रश आणि रंगाशिवाय चित्र रेखाटली जातात. 'इथे थुंकू नये' अश्या सल्यावरच जाणूनबुजून थुंकले जाते. 'इथे थुंकू नये' च्याऐवजी आता देवी देवतांची चित्र लावली जात आहे. तरीही यांना काही फरक पडल्याचे दिसून येत नाही.
आमचा रास्ता देखील खूप सहन करतो. गाडी न थांबता थुकण्याचे यांचे कसब बघण्यासारखेच! इतरांची कुठलीही तमा न बाळगणारा आणि सर्रास कुठेही थुंकणारा, दुसऱ्याच्या पांढऱ्या शर्टवर बॉबी प्रिंटचे डिझाईन बनवणारा, आणि कुणी ओरडलं तर हलकेच सॉरी म्हणणाऱ्या प्रत्येक खर्रावीराचे कौतुक करावे तितके थोडेच!
बसमधून पिचकाऱ्या मारणाऱ्यांची तर चांगलीच खबरबात घ्यायला हवी. कारण त्यांचे खर्रा खाऊन थुंकणे म्हणजे पावसासारखे तुषार उडवणे असते. एकूणच आपला परिसर स्वच्छ राहावा, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं यांना का वाटत नाही??
२६ जानेवारी, १५ आगस्टला हातात झेंडा घेऊन रस्त्यावर सर्रास थुंकत जाणाऱ्या युवापिढीला देशप्रेम अशा गोष्टीतूनच आकार घेत असत, हे कसं शिकवावं हेच कळत नाही. प्रत्येक वेळेला देशप्रेम दाखवण्यासाठी देशाच्या सीमेवर जाण्याची गरज नसते. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते साध्य करू शकतो.
काही लोकं तर इतके मूर्ख असतात, म्हणे 'खर्रामुळे सामाजिक बांधिलकी' वाढते. अनोळखी माणसाची ओळख होते. खर्रा काढला की आजूबाजूचे हात आपसूकच समोर येतात. सिनेमाघरात सिनेमा सुरु होण्याआधीच खर्रा, तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम दाखविले जातात. तरीही अनेकांचे खर्रा प्रेम कमी होत नाही. १२-१३ वर्षे वयाच्या मुलांपासून तर ८०-९० वर्षे जेष्ठांपर्यंत याचे प्रमाण वाढलेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने विशेष लक्षात घेणारी बाब म्हणजे मुखाच्या कर्करोगाचे रुग्ण भरपूर प्रमाणात वाढले आहेत.
शेवटी मला एवढंच सांगायचं आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. आस्वाद घ्यायला निसर्गाने भरपूर दिले आहे. बेरस, बेचव, घातक नशा करण्यापेक्षा, सामाजिक भान बाळगून स्वतःसोबतच देशाच्या प्रगतीचे वाटेकरी व्हा!!
खर्रा khau naka mhatal tr hya eka goshtisathi lok aplyala vedyat kadhtat .khari gosht hi aahe joparyant kahi disadvantages tyanna janvanar nahi toparyant khanare lok Kami karnar nahi.
ReplyDeleteHo na ...
ReplyDelete