रेल्वे प्रवास मला माझ्या लहानपणापासूनच अत्यंत ओढ लावणारा, उत्कंठा वाढवणारा असा वाटत आला आहे.
'झुकझुक अगीनगाडी' लहानपणी कोळशाचा इंधनावर चालणाऱ्या रेल्वेगाड्या फार वेगळ्या प्रवासाच्या अनुभव द्यायच्या. धूर, खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयन्त केल्यास डोळ्यात जाणारे कोळशाचे बारीक कण आणि त्यामुळे डोळे लाल होऊन पाणी यायचे..अशा अनेक आठवणी रेल्वे प्रवासाशी निगडीत आहेत.
वेगवेगळे लोक, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या स्थानकांवर उतरणारे आणि चढणारे.. कधी सहकूटुंब प्रवास करणारे तर कधी एकट्याचाच प्रवास.. मधेच येणारे विक्रेते तर कधी चेकिंगसाठी अचानक चक्कर टाकून जाणारे रेल्वे सुरक्षा दल.
प्रत्येक प्रवास एक वेगळा अनुभव देणारा असतो. मला प्रवासात रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी दिसणाऱ्या गोष्टी पाहायला फार आवडतात.
शेत, रस्ते, नद्या, पूल आणि बरंच काही. प्रवासाचा अन्य कोणताही प्रकार रेल्वेच्या प्रवासाइतका वेगळा भारत- नजीक नेऊ शकणार नाही. रेल्वे प्रवास दरम्यान आपण जे काही पाहतो ते अवर्णनीय असते.
भारतातील रेल्वेचा प्रवास आपणाला आपल्या संस्कृतीचा, आपल्या लोकांच्या आणखी जवळ घेऊन जातो. सोबत प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशी ची एक वेगळीच कहाणी असते. रेल्वे आपल्याला लोकांबरोबर बसण्याची संधी देते. त्यात सर्व प्रकारचे लोक असतात आणि आपणही त्यांच्या सहप्रवासाचा एक भाग बनत असतो.
धबधब्यांच्या जवळून, जंगलातून किंवा लाटांमधून जाताना रेल्वे जेव्हा एखाद्या बोगद्यातून वेगाने जात असते, त्यावेळी प्रत्येकाच्या हृदयात उत्पन्न होणारा रोमांच वेगळाच आनंद देतो.
पावसाळ्यात दाट जंगले किंवा धबधब्याचे संमोहक दृश्य आपण विसरू शकत नाही. वास्तविक जीवनातील बॉलीवूड कथा आपल्या समोर घडतात. रेल्वेचा प्रवास केवळ प्रवासापेक्षा आपल्यासाठी बराच काही असतो. आपल्या सीटवर बसून थकल्यास थोडे चालण्यास किंवा वरच्या बर्थवर आडवे पडण्यास किंवा एखाद्या स्टेशनवर उतरून सावधपणे एखादा फेरफटकाही मारता येतो. रेल्वे प्रवास आपणास नेहमीच आरामदायक वाटतो. आपला झोपेचा कोटा पूर्ण करणाऱ्या काही लोकांसाठीही हा उत्तमच. असो असे कितीतरी वेगवेगळे प्रसंग असतील, पण प्रवास चांगला असला तर मग कधी संपूच नये असं वाटतं,.. फक्त चालत राहावा हा प्रवास..!
Comments
Post a Comment