नमस्कार,
मी करोना विषाणू बोलतोय.
माझा विशेष परिचय देण्याची गरज नाही, मी सर्वपरिचित आहे. मला देशांच्या सीमा माहित नाही ना मला वर्ण, जात, धर्म कळते. एकमेकांमध्ये भेद करणे हा माणसाचा स्वभाव आहे माझा नाही कारण मी विषाणू आहे!
माझा जन्म कुठे झाला हा वादाचा विषय आहे. परंतु एक मात्र नक्की माझा आगमनाने स्वतःला सर्वव्यापी, सर्वज्ञानी समजणाऱ्या मानवी अहंकाराला मोठा धक्का बसलायं. संपूर्ण सृष्टीवर स्वतःचा एकाधिकार गाजवणाऱ्या मानवाला माझ्या येण्याने कळले असेल की, तो फक्त सृष्टीचा एक छोटा भाग आहे, संपूर्ण सृष्टी नाही. या भूतलावर अनेक जीव-जंतू, प्राणी, पक्षी आहेत आणि त्याचाही या पृथ्वीवर मानवा इतकाच आधिकार आहे. माझ्यामुळे कधीही कल्पना न केलेली परिस्थिती मानवावर ओढवली. ओसाड शहरे, निर्मनुष्य रस्ते, गाड्यांचा धूर नाही, उद्योगांचा गोंगाट नाही..सगळीकडे स्मशान शांतता. याच काळात पर्यावर्णनाने सुटकेचा श्वास घेतला. वृक्षांची ताजी हवा, प्राणांचा मुक्तसंचार, स्वच्छ प्रवाहित नद्या, दूरवरून दिसणारे स्पष्ट डोंगर, म्हणजे संपूर्ण निसर्ग त्याच्या मूळ स्वरूपात आहे. मी नसतो तर कदाचित नव्या पिढीला हे दृश्य कधीच बघायला मिळाले नसते. या प्रसंगातून धडा न घेता पर्यावरण घटकांना मोकळी दाद दिली नाही तर माझ्यासारखे विषाणू मानवाला त्याची खरी जागा दाखवत राहील हे नक्की.
होय हे खरे आहे की, माझ्यामुळे जगभरातील लाखो लोकांना जीव गमवावे लागले. अनेकांचे रोजगार गेले आणि कोट्यवधी लोकांची जीवनशैलीच बदलून गेली. मी विषाणू आहे परंतु हे हि तितकेच खरे आहे, ..डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी धडपडत असताना औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजनचा काळाबाजार करणारे कोण आहेत? खऱ्या अर्थाने तेच मानवी समाजातील विषाणू आहे. मानवाला माझ्यामुळे कमी पण अशा मानवी विषाणूमुळे अधिक धोका आहे.
स्वतःला जनतेचे कैवारी म्हणून घेणाऱ्या राजकीय नेत्यांना समाजातील विषाणू का म्हणू नये? त्यांनी इतके वर्ष आरोग्यव्यवस्थेवर लक्ष का नाही दिले? सक्षम आरोग्य व्यवस्थेचे महत्व समजावून देण्यासाठी मला येण्याची गरज का पडली? भारतात एक लाख लोकांसाठी फक्त ९१ डॉक्टर आणि १३९ हॉस्पिटल बेड उपलब्द असल्याचे आकडेवारी सांगतात. अशा परिस्थितीत तुम्ही माझ्याशी कसे लढणार? ते शक्यच नाही. लोकांच्या मृत्यूसाठी जितका मी दोषी आहे, तितकेच "सेवक" म्हणून मिरवणारे राजकीय नेतेसुद्धा आहेत.
तसा माझा आकार फारच छोटा आहे. सध्या डोळ्यांनी न दिसण्याइतकाच. पण मी मानवाला मोठी शिकवण दिली आहे. हि शिकवण मानवाला अनेक वर्षे लक्षात राहील. मी एक विषाणू आहे,आज ना उद्या माझाही अंत होणार हे नक्कीच. परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी होणार. पण मानवाने यापासून काही धडा घेतला नाही तर माझ्यासारखे अनेक विषाणू, "मी पुन्हा येईल..मी पुन्हा येईल " असे म्हणत मानवापुढे आव्हाने उभे करत राहतील.
तुमचा नावडता,
करोना विषाणू
Comments
Post a Comment