आई ही अशी दैवत आहे जी आपल्या मुलांना खूप जपते, त्यांना घडवते, कुठल्याही परिस्थितीत आपण कसं आनंदी राहू हे शिकवते.
त्यादिवशी मी नाराज होते तेव्हा आईने मला एक साधी गोष्ट सांगितली.
ती गोष्ट अशी,
एक मुलगा फुगा घेण्यासाठी त्याच्या आईकडे हट्ट धरतो, कारण त्याला त्या फुग्यासोबत मनसोक्त खेळायचं होते. हट्ट बघून आई त्याला फुगा घेऊन देते. मग तो मैदानावर सतत त्या फुग्या सोबत इकडून तिकडे, कितीतरी वेळ, अतिशय आनंदाने खेळत राहतो. मुलाचा आनंद बघून तिच्याही चेहऱ्यावर हास्य खुलते. पण अचानक तो फुगा त्याच्या हातून सुटून आकाशाच्या दिशेने उडायला लागतो. तेव्हा त्याच्या आईला वाटते आता हा पुन्हा हट्ट धरणार. पण तो फुगा उडत दिसताना आणखी आनंदी होतो, खळखळून हसायला लागतो.
बस एवढीच ही गोष्ट, असं सांगून माझ्या आईने मला प्रश्न केला, सांग बर तुला यातून काय शिकायला मिळालं.
यावर आईला मी म्हटलं, आई हे बघ, आता मला काहीही सुचत नाही आहे. तूच सांग बघू.
आईने सांगितलं,
"आपण गोष्टीतल्या छोट्या मुलासारखं असावं, त्याच्याकडे त्याच्या आवडीचा फुगा होता म्हणून तो फार आनंदी होता. आणि जेव्हा त्याचा हातून तो फुगा निघून गेला, तेव्हा तो फुगा आपल्याकडे नाही, या विचाराने कदाचित दुःखी होऊ शकला असता पण तो आणखी खळखळून हसत आनंदी झाला. कारण त्याला ती वस्तू उंच आकाशात उडताना दिसली.
असच माणसांचं पण असावं, पाहिजे ते हाती असेल किंवा नसेल, तरी कुठल्याही परिस्थितीत माणसाने आनंदी असावं"
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment