जगात विविधरंगी स्वभावाचे माणसे तर आहेच पण त्यांच्यात गुणही तितकेच विविधरंगांनी निखळपणे भरलेले आहेत. रोज माणसांना कोण, कसली, कुठली हे माहीत नसताना इतरांपेक्षा वेगळी आणि चांगली कामे करताना बघून मन आनंदाने भारावून येतं. आजही असला आनंद मी अनुभवला. छोटीशी ती मुलगी पण मन मात्र फार मोठं. मातीत खेळताना एक मुंगी तिला लाकडाच्या काडीवर चढताना दिसली. इतर सगळ्या मुंग्या काडीच्या टोकावरती येऊन पोहोचल्या होत्या. आणि ही मुंगी मात्र चढायची आणि घसरून खाली पडायची. ही क्रिया सारखी घडत असल्याने त्या मुलीला दया आली. तिने खाली पडलेल्या झाडाचे एक पान उचललं आणि त्या पानावरती मुंगीला घेतलं. आणि त्या मुंगीला त्या लाकडी काडीच्या टोकावर पोहोचवलं. मी हे सगळं दुरून बघत होते मग जवळ जाऊन कौतुकाने तिला विचारलं. " हे काय केलस ग?" त्यावर ती म्हणाली, " ती एकटीच होती ना खाली, मग मी तिला तिच्या मैत्रिणीकडे पोहोचवलं. आता ती तिच्या मैत्रिणी सोबत सहज खेळू शकेल".
खरंतर प्रसंग फार छोटासा पण त्या मुलीने लाखमोलाची शिकवण दिली.
दुसरा प्रसंग घडला तो ऑटोमधून घरी परतांना. सवारी म्हणून काका काकू ऑटोमध्ये बसले. स्टॉप आलं असता उतरताना त्यांच्याकडे सुटे पैसे नव्हते. ऑटोत बाकी कुणाकडेही नव्हते. मग सुचवलं कि ऑनलाईन पेमेंट करा. पण तेही त्यांच्याकरिता अशक्य कारण त्यांच्याकडे ऑनलाईन मोड नव्हता. सगळे ऑटोमधले प्रवासी मात्र त्यांच्या नावाने पंधरा मिनिट बडबडत राहिले. मागून एक गृहस्थ आले त्यांनी ऑटोवाल्याला विचारलं, "कुठे जात आहे ऑटो?" तेव्हा ते सहजतेने ऑटोवाल्याला म्हणाले, "तुम्ही गाडी पुढे चालवा यांचे चाळीस रुपये मी देतो." गाडी जशी समोर जात राहिली तसे माझ्या डोक्यात विचारांचे वादळ सुरु होत गेले. हे गाडीतल्या प्रत्येक माणसाला जमलं असत. पण हे कुणाच्याही ध्यानात आलं नाही निदान माझ्याही नाही. फक्त मला उशीर होत आहे हाच विचार डोक्यात होता. एका छोटाश्या कामाने या माणसाने मात्र एका क्षणात सगळ्यांचे मन जिंकले. मुळात सहकार्याची भावना किती महत्वाची आहे हे चांगलेच समजले.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment